सरबजीतची नाही, सुरजीतची सुटका होणार
नवी दिल्ली: सरबजितच्या सुटकेवरुन पाकिस्तानने पुन्हा घुमजाव केलं आहे.
पाकिस्तानच्या जेलमधून सरबजीत नाही तर सुरजीत सिंगची सुटका होणार असल्याचं पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी सांगितलयं. रात्री उशिरा त्यांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे.
तब्बल आठ तासांनंतर त्यांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत झालेला कैदी सुरजीत आहे सरबजीत नाही. असं फरहतुल्ला बाबर यांनी म्हटलयं.
सुरजीत सिंग ३० वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहे. त्याला बॉर्डरवर अटक करण्यात आली होती. पंजाबच्या फरीदकोर्ट येथे राहणाऱ्या सुरजीत सिंगची पाकिस्तानच्या जेलमधून सुटका होणार आहे.
मात्र काल सायंकाळी गेली २२ वर्षे पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या सरबजित सिंगची लवकरच सुटका होण्याची बातमी होती.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी सरबजितची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित केल्याचं समोर येत होतं. मात्र अचानक काय घडलं? पाकिस्तानच्या राष्ट्रध्यक्षांवर असा कोणता दबाव होता की सरबजितच्या ऐवजी सुरजीतची सुटका होणार आहे ही माहिती रात्री उशीरा पीटीआयला द्यावी लागली.







