कैरो: इजिप्तमध्ये गेल्या आठवड्यात पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. मुस्लिम ब्रदरहूडचे मोहम्मद मुर्सी इजिप्तचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. इजिप्तचे निवडणुक आयुक्त फारुख सुलतान यांनी मुर्सी यांच्या नावाची घोषणा केली.
मुर्सी यांच्या नावाची घोषणा होताच कैरोच्या ऐतिहासिक तहरीर चौकात त्यांच्या पाठिराख्यांनी एकच जल्लोष केला. इजिप्तचे माजी पंतप्रधान अहमद शफीक यांचा पराभव करत मुर्सी अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. ६० वर्षांच्या मुर्सी यांनी ५१.७३ टक्के मतं पटकावत प्रतिस्पर्धी शफीक यांना मागे टाकलं. सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले मुर्सी हे इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.







