ग्दांस्क (पोलंड): युरो कपची पहिली सेमी फायनल आज पोर्तुगाल आणि स्पेन या दोन बलाढ्य संघात रंगणार आहे.
युरोपतीलच नव्हे तर फुटबॉल विश्वातले दोन बलाढ्य संघ म्हणून स्पेन आणि पोर्तुगालची ओळख आहे. आता हेच दोन्ही संघ युरो कपची फायनल गाठण्यासाठी आमने सामने येणाऱ आहेत.
स्पेनकडे कर्णधार आणि गोलकीपर इकर कसियास, मिडफिल्डर झॅबी अलोन्सो आणि फॅब्रिगास, स्टार स्ट्रायकर फर्नान्डो टोरेस अशी तगडी टीम आहे. तर याविरुद्ध पोर्तुगालचा वन मॅन आर्मी ख्रिस्तियानो रोनाल्डो संघ सहकाऱ्यांसोबत लढा उभारणार आहे.
त्यामुळे या दोन्ही संघात कडवी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या दोन साखळी सामन्यात रोनाल्डो आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र त्यानंतर डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यात त्याने २ गोलची नोंद केली. रोनाल्डोनं या २ गोल्सवर समाधान न मानता नॉक ऑऊट राऊंडमध्ये चेक रिपब्लिकवर एका गोलची नोंद केली आणि संघाला सेमीचं तिकिट बुक करून दिलं.
रोनाल्डोचा फॉर्म पाहता रोनाल्डोकडून आता त्याची पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. रोनाल्डोला पॉस्टिगो ,नानी आणि पेपेसारख्या खेळाडूंची साथ लाभली तर पोर्तुगाल स्पेनवर मात करु शकते.
मात्र यापूर्वीचा इतिहास स्पेनच्या बाजूने आहे. फिफा वर्ल्ड कप २०१० मध्ये स्पेननं पोर्तुगालला नॉक ऑऊट राऊंडमध्ये बाहेरचा रस्ता दाखवत कपवर आपलं नाव कोरलं होतं. एवढच नव्हे तर गतवर्षीचे युरो चॅम्पियन्स म्हणून त्यांनी आपली ओळख कमवाली. तेव्हा स्पेनला रोखणं तसं पोर्तुगालसाठी कठिणचं म्हणावं लागेल.
या सामन्यात स्पेनचं पहिलं आव्हान ख्रिस्तियानो रोनाल्डोला रोखण्याचं असेल. रोनाल्डोला रोखण्यात स्पेनला यश आलं. तर स्पेनचा विजय निश्चित समजावा आणि जर रोनाल्डोनं स्पेनवर हल्लाबोल केला तर विश्वविजयी संघाचा परभव अटळ आहे.
तेव्हा युरो कपच्या फायनलचं तिकीट कोण मिळवणार याकडे तमाम फुटबॉल फॅन्सच्या नजरा लागल्या आहेत.







