फाईल महसूल विभागाने क्लिअर केली

मुंबई: आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. विलासरावांनी घोटाळ्याचं खापर महसूल खात्यावर फोडत अशोक चव्हाण यांच्याकडे बोट दाखवलं आहे.
विलासराव देशमुखांची आज चौकशी आयोगासमोर साक्ष झाली. महसूल खात्याकडून तपासून आलेल्या फाईल्समध्ये मुख्यमंत्री तेवढं लक्ष घालत नाहीत, असं विलासरावांनी आयोगासमोर सांगितलं. त्यावेळी अशोक चव्हाण हे महसूलमंत्री असल्याने विलासरावांनी सर्व खापर त्यांच्यावरच फोडल्याचं उघड झालं आहे.
शिवाय प्रधान सचिवांकडून आपल्याला योग्य ती माहिती मिळाली नसल्याचंही विलासरावांनी म्हटलं आहे.
आदर्शची फाईल क्लिअर करण्याचं काम महसूल विभाग करतं. त्यामुळे इमारतीला जागा देण्याचा निर्णय हा सर्वस्वी महसूल विभागाचा होता. त्यामुळे याप्रकरणात आपली कोणतीही भूमिका नव्हती, असं विलासरावांनी स्पष्ट केलं आहे.
विलासरावांची उर्वरित साक्ष उद्या होणार आहे. तर अशोक चव्हाणांची साक्ष ३० जून रोजी होणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण चौकशीत कोणता गौप्यस्फोट करणार याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या साक्षीमध्ये विलासरावांकडे बोट दाखवलं होतं. जमीन वापराबाबतचं लेटर ऑफ इंटेट हे आधीच्या मुख्यमंत्र्यांनीच दिल्याचं म्हटलं. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंचा रोख विलासराव देशमुखांकडेच होता.







