परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णानवी दिल्ली: देशातील सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात येणे आवश्यक आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एम कृष्णा यांनी व्यक्त केलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरफार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कृष्णा यांनी राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशासाठी जोर धरला आहे.

यापूर्वीच राहुल गांधी हे मंत्रिमंडळात सहभागी होतील, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटल्याचं कृष्णा यांनी सांगितलं.

“ मंत्रिमंडळामध्ये आम्हाला नेहमीच राहुल गांधींचा समावेश हवा आहे. पंतप्रधानांनीही त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. मात्र, सध्या राहुल गांधींच त्यासाठी इच्छुक नसल्याचं दिसतंय,” असं कृष्णा यांनी पत्रकारांना सांगितलं.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी नुकताच अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना मंत्री करण्याबाबत विचारलं असता, कृष्णा म्हणाले, “ देशासमोर येणाऱ्या समस्यांच्या पूर्ततेसाठी राहुल गांधींनी मंत्रिमंडळात सहभागी होणं आवश्यक असल्याच्या मताचा मी आहे.”

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणवदांनी राजीनामा दिला आहे. तर तिकडे केंद्रीय लघु उद्योग मंत्री वीरभद्र सिंह यांच्यावर न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सिद्ध केल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.  त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरफार होणार आहे.


article comments powered by Disqus