नवी दिल्ली: अमेरिका, युरोप आणि ब्राझीलप्रमाणे भारतातही पेट्रोलचे दर दररोज बदलण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालय या नव्या फॉर्म्युल्यावर विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्रालय सरकारी तेल कंपन्यांनावर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या आधारावर दररोज किंमती बदलत राहाव्यात यासाठी दबाव वाढवत आहे.

पेट्रोल पंपसूत्रांच्या माहितीनुसार सरकार उच्च पदाधिकारी आणि तेल कंपन्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. देशाची सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला या फॉर्म्युलावर एक नोट तयार करण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

मात्र याबाबत अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव तयार झालेला नाही. तेल कंपन्या सध्या तरी पंधरवड्यात पेट्रोलचे दर बदलण्याच्या घोषणा करतात.

पेट्रोलचे दर वाढल्याने देशभरातून सरकारवर टीका केली जाते, त्यामुळे हा फॉर्म्युला राबवण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. जेव्हा पेट्रोलचे दर वाढवले जातात त्यावेळी सरकारला विरोधक आणि जनतेच्या टीकेला सामोरं जावं लागतं.   

पेट्रोलचे दर रोज बदलत राहिल्यामुळे सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा एकदम पडणार नाही, असं पेट्रोलियम मंत्रालयाचं म्हणणं आहे.

पण सरकारच्या या विचारावर पेट्रोलपंप चालक नाराज आहे. पेट्रोलचे दर नेहमी बदलत राहिले तर अकाऊंटिंगमध्ये अडचण निर्माण होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.


article comments powered by Disqus