राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

नाशिक कॉलेज तोडफोड

नाशिक: नाशिकच्या महावीर पॉलिटेक्निक कॉलेजात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. महाविद्यालयातील प्रवेशासाठी ७५ हजारांची लाच घेतल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.

दिंडोरी रस्त्यावर म्हसरुळ शिवारात असलेल्या या महाविद्यालयात प्रवेशासाठी एका विद्यार्थ्याकडून ८० हजार रुपये मागितले. ही माहिती मिळताच राष्ट्रवादी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयावर धडक दिली आणि तिथले विभागप्रमुख सुहास पाटील यांना ७५ हजारांचं डोनेशन घेताना एबीपी माझाच्या कॅमेरानेही रंगेहाथ पकडलं.

यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महाविद्यालयाची तोडफोड सुरु केली. कार्यकर्त्यांनी काचांसह फर्निचरची तोडफोड केली. यापुढेही नाशिकमधील कुठल्याही महाविद्यालयाने डोनेशन घेतलं तर त्यांना अशीच अद्दल घडवणार, असं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिक्षणसम्राटांचा पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच अशा प्रकारचं आंदोलन केलं. त्यामुळे डोनेशनच्या नावाखाली सुरु असलेला शिक्षणसम्राटांच्या दरोडीखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


article comments powered by Disqus