मुंबई: मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्ष बीकॉमचा ह्यूमन रिसोर्स या विषयाचा पेपर फुटला असल्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण आज (रविवारी) झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत ह्युमन रिसोर्स या विषयाचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्यूमन रिसोर्सचा हा पेपर आता ११ एप्रिलला होणार आहे.
याप्रकरणातलं गांभीर्य ओळखून विद्यापीठाच्या शिक्षणमंडळाची सोमवारी होणारी बैठक रविवारीच घेण्यात आली.
भिवंडीमधील बीएनएन कॉलेजमध्ये बुधवारी पेपरफुटीचा हा घोळ झाला. दुसऱ्या दिवशीचा पेपर आधीच दिला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधितांच्या हे लक्षात आणून दिल्यावर पेपर काढून घेण्यात आलं. मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रश्न पाहून घेतल्याचं या विद्यार्थ्यांनं सांगितलंय.
त्यामुळे २८ मार्चला ह्युमन रिसोर्सचा पेपर काय असणार हे विद्यार्थ्यांना आधीच समजलं होतं. भिवंडीतल्या सेंटरवरुन ही बातमी नंतर अनेक कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली. अर्थात असा काही प्रकार घडला नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितलं.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनीही पेपर फुटीच्या प्रकरणावर सारवासारवीचीच उत्तर दिली होती. पण राजकीय रेटा आणि विद्यार्थ्यांचा असंतोष यांमुळे या प्रकरणी चौकशी समिती नेमावी लागली.
संबंधित बातम्या







